`राजन साळवींना तिकीट देऊ नका`, कोकणामध्ये शिवसेनेत अंतर्गत धुसपूस
कोकणामध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसपूस समोर आली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडी वेगाने वळण घेत आहेत. युतीचे मेटकुट अद्याप जमलं नसलं तरी कोकणामध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसपूस समोर आली आहे. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे राजन साळवी यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, असे यात म्हटले आहे.राजन सा़ळवींविरोधात स्थानिक पदाधिकारऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचं काम केल्याचा आरोप शिवसैनिकांनी राजन साळवी यांच्यावर ठेवला आहे. रत्नागिरीत वेळोवेळी विरोधी पक्षाला मदत केली असेही यात म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साडेतीनशेहून अधिक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचं पत्र पाठवण्यात आलं आहे. तिकीट वाटप होण्याआधी राजापूरचे पदाधिकारी पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी राजन साळवी यांना पुन्हा उमेदवारी देणे पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
साळवी यांच्यावरील आरोप
निलेश राणेंनी बाळासाहेबांबद्दल अपमानकारक वक्तव्य करुनही राजन साळवी गप्प राहीले.
२००९, २०१४ आणि २०१९ साली रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी साळवी यांनी निलेश राणे यांना सहकार्य केले.
मतदार संघामध्ये निधी वाटप करताना मर्जीतील ठिकाणी निधी दिल्यामुळे मतदार संघांमध्ये नाराजी.
२०१८ च्या राजापूर नगरपरिष पोट निवडणुकीत विरोधकांशी आर्थिक तडजोड केली. क्षमता असलेला उमेदवार जाणिवपूर्वक दिला नाही.