पंढरपूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये महाआघाडी झाली आहे. २८८ पैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५-१२५ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर मित्रपक्षांना उरलेल्या जागा सोडण्यात आलेल्या आहेत. पण पंढरपूरच्या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली नाही तर या मतदारसंघात महाआघाडी नसेल. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून शिवाजी काळुंगेंना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपकडून सुधाकर परिचारक रिंगणात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे. या दिवसापर्यंत कोणत्याच उमेदवाराने त्याचे अर्ज मागे घेतले नाहीत, तर या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होऊ शकते. 


पंढरपूरमध्ये जशी अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे, तशीच भाजप-शिवसेना महायुतीची कणकवलीतली अवस्था आहे. कणकवलीमध्ये भाजपकडून नितेश राणे यांना तर शिवसेनेने सतीश सावंत यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने सुशील राणेंना कणकवलीचं तिकीट दिलं आहे.