मोदींच्या पुण्यातल्या सभेसाठी एसपी कॉलेजमध्ये वृक्षतोड
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात एसपी कॉलेज मैदानावरची झाडं तोडण्यात आली आहेत.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात एसपी कॉलेज मैदानावरची झाडं तोडण्यात आली आहेत. मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ही झाडं अडथळा होत असल्याचं सांगत झाडं तोडून टाकली. या ठिकाणची तब्बल १५ ते २० झाडं छाटण्यात आली आहेत. पुण्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीने या वृक्षतोडीचा निषेध केला आहे, तर महापालिकेची परवानगी घेऊनच झाडं तोडल्याचं एसपी कॉलेजने म्हटलं आहे.
१७ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदी सभा घेतील. यानंतर ते साताऱ्याला रवाना होतील. साताऱ्यातून विधानसभेसाठी शिवेंद्रराजे भोसले तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतर मोदी पुण्यात येणार आहेत. पुण्याच्या एसपी मैदानावर संध्याकाळी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. १७ तारखेच्या सभा झाल्यानंतर मोदी पुन्हा दिल्लीला रवाना होतील, आणि १८ तारखेला मुंबईत मोदींची प्रचारसभा असेल. मुंबईतल्या सभेतून मोदी प्रचाराची सांगता करणार आहेत.