मुंबई : आजपासून राज्यात पुन्हा नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू होत आहे. अकोला, जालना आणि नंतर पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. यापैकी पहिली सभा अकोल्यातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडा मैदानात सकाळी १० वाजता होत आहे. तर दुसरी सभा जालन्यातल्या परतूरमध्ये दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमाराला होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये संध्याकाळी पाऊणे पाच वाजता ते प्रचारसभा घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल, पेण, ऐरोली, बेलापूर विधानसभआ मतदारसंघांतल्या भाजपा शिवसेना आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी, नरेंद्र मोदी खारघरमध्ये सभा घेणार आहेत. खारघरमधील सेक्टर २९ इथल्या सेंट्रल पार्क जवळच्या भव्य मैदानावर ही प्रचारसभा होईल.


यानंतर १७ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदी सभा घेतील. यानंतर ते साताऱ्याला रवाना होतील. साताऱ्यातून विधानसभेसाठी शिवेंद्रराजे भोसले तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतर मोदी पुण्यात येणार आहेत. पुण्याच्या एसपी मैदानावर संध्याकाळी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. १७ तारखेच्या सभा झाल्यानंतर मोदी पुन्हा दिल्लीला रवाना होतील, आणि १८ तारखेला मुंबईत मोदींची प्रचारसभा असेल. मुंबईतल्या सभेतून मोदी प्रचाराची सांगता करणार आहेत.


राज्यातल्या आजच्या सभा


मोदींशिवाय आज उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात दोन सभा घेणार आहेत. कणकवलीमध्ये भाजपने नितेश राणेंना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे.  


दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्यात तीन अमरावतीत एक तर नागपूरमध्ये दोन, अशा एकूण सहा सभा घेणार आहेत. शरद पवार नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, बीडमध्ये आणि मुंबईत दोन, अशा एकूण चार ठिकाणी सभा घेणार आहे. तर अजित पवारांच्याही शिरूर इंदापुरात आणि आदित्य ठाकरेंच्याही मुंबादेवी, दुर्गादेवी चौक कुंभारवाडा इथे प्रचार सभा होत आहेत.