मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ च्या प्रत्यक्ष मतदानाला आता १० दिवसही उरलेले नाहीत. अशावेळी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला धार आलीय. गेल्या काही निवडणुकीचा अनुभव घेतल्यानंतर आता तर प्रत्येक पक्षानं आणि प्रत्येक उमेदवारानं आपल्या प्रचारासाठी सोशल मीडिया हे मुख्य साधन वापरायचं ठरवलंय. त्यामुळेच, जाहीर सभांत होणारी प्रत्यक्ष टीका-टिप्पणी सोशल मीडियावरही दिसू लागलीय. प्रत्येक पक्षाकडून विरुद्ध पक्षावर केलेली टीका सोशल मीडियावरून व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. यात मोबाईल ऍप व्हॉटसअपचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच, पोलिसांनी आता थेट व्हॉटसअप ग्रुप ऍडमिनलाच टार्गेट केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक नोटीस काढून व्हॉटसअप ग्रुप ऍडमिनला तंबी दिलीय. 


व्हॉटसअप ग्रुप ऍडमिनला पोलिसांची नोटीस

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही व्हॉटसअप ग्रुपचे ऍडमिन असाल तर आपल्या ग्रुपमध्ये कोणकोणत्या व्यक्तींना समाविष्ट करायचं किंवा नाही याचे अधिकार तुमच्याकडे असतात. या ग्रुपवर कोणते संदेश येतात किंवा पाठवले जातात, याबद्दल तुम्हाला पूर्ण कल्पना असते, असं नमूद करत कोणत्याही आक्षेपार्ह मजकूरासाठी किंवा फोटोसाठी व्हॉटसअप ग्रुप ऍडमिनलाही जबाबदार धरण्यात येईल, हे पोलिसांनी स्पष्ट केलंय. 



सध्या विधानसभा निवडणूक जवळ आली असून राजकीय पक्षावर किंवा वैयक्तिक टीका-टिप्पणी हे व्हॉटसअप किंवा सोशल मीडियामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. व्हॉटसअप ग्रुपमध्ये राजकीय किंवा वैयक्तिक टीका-टिप्पणी करू नये, याबाबत आपल्या ग्रुपमधील सदस्यांना पूर्वकल्पनाही द्यायची जबाबदारी ग्रुप ऍडमिनची आहे. व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह टीका-टिप्पणी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं आढळलं आणि आपण त्या व्हॉटसअप ग्रुपचे ऍडमिन असाल तर पोस्ट करणाऱ्या सदस्यासोबत ऍडमिनलाही जबाबदार धरण्यात येईल आणि तुमच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी आपल्या नोटिशीत म्हटलंय.