मुंबई : विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज देखील सज्ज झालं आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्षलग्रस्त गडचिरोलीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था देखील करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यात पावसाचं धूमशान असून आजही पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. पावसाचा परिणाम मतदानावर होणार का? अशी चिंता उमेदवारांना लागून राहिली आहे. 


राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १ लाख ३५ हजार व्ही व्ही पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.


मतदान हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा अधिकार जरुर बजावावा असं आवाहन, झी २४ तास सर्वांना करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदानकेंद्रावर ओळख पटवण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे सांगितले आहे. पाऊस कितीही असला तरीही आपण मतदान कराच; झी २४ तासचं सगळ्या मतदारांना आवाहन...