पुण्याच्या ३ जागांवर शिवसेनेची बंडखोरी
पुण्यात एकही जागा न मिळालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या उमेदवारांविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे.
पुणे : पुण्यात एकही जागा न मिळालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या उमेदवारांविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. पुण्यातल्या तीन जागांवर शिवसनेचे बंडखोर मैदानात उतरले आहेत. खडकवासला, वडगावशेरी आणि कसबा पेठेच्या जागेवर शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला आहे. आज शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत खडकवासला मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. तर कसबा पेठ मतदार संघातून शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी भाजपा उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे.
पुण्याच्या सगळ्या जागांवर भाजपचाच उमेदवार देण्यात आला आहे. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, वडगावशेरीमधून जगदीश मुळीक, पुणे कॅन्टोनमेंटमधून सुनिल कांबळे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, हडपसरमधून योगेश टिळेकर, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, कसबा पेठेतून मुक्ता टिळक, खडकवासलातून भीमराव तापकीर यांना भाजपने तिकीट दिलं आहे.