यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांचा सत्ताधारी पक्षाच्या डोक्याला ताप
१९९९च्या निवडणुकीची पुनरावृत्ती
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. राज्यात ५८.४९ टक्के मतदानाची नोंद देखील झाली आहे. २०१४ च्या तुलनेत मतदारांनी यंदा मतदानाकरता कमी उत्साह दाखवल्याचे समोर आले आहे. असं असताना यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बंडखोरांचा सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या डोक्याला ताप होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत जवळपास ७० बंडखोर रिंगणात होते. यातल्या ४० बंडखोरांमुळे त्या त्या ठिकाणचे निकाल बदलणार आहेत. यात शिवसेनेला बंडखोरांचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापूर, नाशिक, जळगाव, ठाणे आणि नांदेडमध्ये बंडखोरांचा निकालावर स्पष्ट प्रभाव पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. यापूर्वी १९९९च्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या संख्येनं बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते.
राज्यभरात भाजपा-शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बंडखोर उमेदवार उभे राहिले. त्यामुळे युती मधील उमेदवारांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात युतीमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मातोश्रीच्या रिंगणात शिवसेनेकडून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला असून नाराज असणाऱ्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत यांच्या भांडणांमध्ये तिसरा उमेदवार काँग्रेसच्या सिद्दीकी यांना फायदा होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्सोवा विधानसभा मतदार संघात युतीमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्राम या पक्षाला ही जागा लढविण्यासाठी सोडण्यात आली. मात्र या उमेदवाराने भाजपच्या चिन्हावर भारती लव्हेकर यांनी निवडणूच्या रिंगणात उतरले. नाराज असणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि नगरसेविका राजूल ताई पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र या बंडाला थंड करता आले नसून याठिकाणी भाजपकडून भारती लव्हेकर अपक्ष राजुल पटेल तर काँग्रेसकडून बलदेव खोसा अशी ही तिहेरी लढत पाहायला मिळाली आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्या विरोधात देखील बंडखोरी झाली. भाजपचे माजी नगरसेवक मुर्जी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या ठिकाणीदेखील दोघांमधील भांडणाचा लाभ काँग्रेसचे उमेदवार यांना होईल असे म्हटले जात आहे.
मीरा-भाईंदर मतदार संघात यावेळी तिहेरी लढत पाहायला मिळाली. कारण भाजपाचे उमेदवार असणारे नरेंद्र मेहता यांच्याविरोधात माजी महापौर गीता जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु या बंडखोर उमेदवाराला भाजपकडून थंड करण्यासाठी यश आले नाही. भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्यावर शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून आरोप सुरु आहेत. शिवसेनेच्या भूमिकेमुळे देखील ही निवडणूक नरेंद्र मेहता यांना प्रतिष्ठेची झाली आहे. यामध्ये देखील नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्या भांडणामुळे काँग्रेसचे उमेदवार मुजफऱ हुसेन यांना फायदा होतो का ? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.