निलेश वाघ, झी मिडिया, मालेगाव : निवडणुका उमेदवारांना काय करायला लावतील याचा नेम नाही. उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी आपल्या मुळ पक्षाची साथ सोडून इतर पक्षांमध्ये उड्या मारल्या. तर काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली. अशीच काहीशी अनुभुती मालेगावमधील मतदारांना आली आहे. मराठीचा अट्टाहास करणाऱ्या शिवसेना पक्षाच्या नेत्याला मतदारांना खूष करण्यासाठी हिंदीतून आपले भाषण पूर्ण करावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मतांचा जोगवा मागण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी चक्क हिंदीतून भाषण मुस्लिम मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे मालेगाव बाह्य मतदार संघातून निवडणुक लढवीत आहेत. या मतदार संघात रमजानपुरा, द्याने आणि मालदे हे मुस्लिम बहुल भाग येतात. या भागातील मुस्लिम बांधव प्रामुख्याने हिंदी भाषा बोलतात. भुसे यांनी भागात प्राचार सभा  घेतल्या. मात्र भुसे यांना येथे मतदाराशी संवाद साधण्यासाठी हिंदी बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. 


त्यामुळे भुसे यांनी चक्क हिंदीतून भाषण करीत मुस्लिम बांधवांना खूष करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मराठी बाणा जपण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्याला मतांसाठी हिंदी भाषण करण्याची वेळ आली. मतांचा जोगवा मागताना शिवसेनेचा मराठी बाणा कुठे गेला ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शेवटी निवडणूक आहे. निवडणुकीत सर्व माफ असेच  म्हणण्याची वेळ या प्रसंगाच्या निमित्ताने आली आहे.