हातवारे करत पवारांनी भाजपाला डिवचले
कुस्ती पेहलवानांशी होते, अशांशी नाही असे म्हणत शरद पवार यांनी विशिष्ट प्रकारचे हातवारे केले.
सोलापूर : आमच्यासमोर कुस्ती लढायला कोणीच नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केला होता. तसेच शरद पवार आमच्यावर टीका करतात म्हणून त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत उत्तर देतो असेही त्यांनी 'झी २४ तास' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले होते. याला शरद पवार यांनी खास शैलीत उत्तर दिले आहेत. कुस्ती पेहलवानांशी होते, अशांशी नाही असे म्हणत शरद पवार यांनी विशिष्ट प्रकारचे हातवारे केले.
हे हातवारे प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले आहेत. या व्हिडीओची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण भाजपाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र भूमकर यांच्या प्रचारासाठी ते सोलापुरात बार्शीत आले होते. 'मुख्यमंत्र्यांनी म्हटले की आमचा पहेलवान तेल लावून तयार आहे. पण लढायला कोणी तयारच नाही. पण कुस्ती पेहलवानांशी होते. 'अशां'शी होत नाही' असे वक्तव्य पवारांनी केले.
शिवसेनेला खोचक सवाल
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल त्यांनी विचारला.
यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयांमध्ये सकस थाळी देण्याच्या घोषणेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून राज्यात एक रुपयात झुणका भाकर अशी योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, पुढे त्याच काय झालं? झुणका भाकर केंद्रे बंद पडली आहेत. या केंद्रांची जागा हडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.