मुंबई : प्रचाराचा आज शेवटचा रविवार, जळगावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर लातूरमधून राहुल गांधींची प्रचाराला सुरुवात होत आहे. अमित शाह, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरें आणि शरद पवारांचाही राज्यभर प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज प्रचाराचा सुपरसंडे आहे. प्रचाराचा हा शेवटचा रविवार असल्याने प्रत्येक पक्षाने आपले दिग्गज चेहरे प्रचारासाठी उतरवले आहेत. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. जळगावातील कुसुंबा इथे मोदींची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर भंडाऱ्यातील साकोलीतल्या सेंदूरफाटा इथे दुसरीसभा होईल.


भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातल्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. प्रचारातली मोदींची ही पहिली सभा असल्यामुळे भाजपाने सभेची जोरदार तयारी केली आहे. मैदानावर एक लाखांहून अधिक नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा भाजपाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आलेत. 


काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधीही आज महाराष्ट्रात येणार आहेत. लातूरच्या औसा शहरातून ते प्रचाराला सुरुवात करतील. त्यानंतर मुंबई चांदिवली येथे नसीम खान यांच्या प्रचारासाठी आणि धारावीत वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी सभा घेतील. पोलिसांनी या दोन्ही सभास्थळांची कसून तपासणी केली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गाड्या पोलिसांनी हटवल्या आहेत. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या देखील आज चार सभा आहेत. कोल्हापूरमध्ये ते पहिली सभा घेतील त्यानंतर साताऱ्यातील दक्षिण कराड, पुण्यातील शिरूरमध्ये आणि शेवटी औरंगाबादमधील लासूर इथे त्यांची सभा होईल. 


भाजपा महाराष्ट्रतर्फे आज 'मुंबई चाले भाजपा सोबत' हे महाजनसंपर्क अभियान मुंबईभर राबवण्यात येत आहे. मरीन ड्राईव्हच्या हॉटेल ट्रायडेंटपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंबई भाजपा अध्यक्ष तसंच मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅडव्होकेट मंगलप्रभात लोढा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहूल नार्वेकस सहभागी होणार आहेत. त्यानंतर जसजशी ही प्रभातफेरी पुढे जाईल तसतसे भाजपाचे दिग्गज नेते आणि भाजपा उमेदवार यात सहभागी होतील. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज पाच सभा असणार आहेत. पंतप्रधानांसोबत जळगावच्या सभेतून त्यांच्या प्रचाराला सुरुवात होईल. त्यानंतरबुलढाण्यात त्यांच्या तीन सभा होतील आणि शेवटची सभा मुंबईतील वर्सोवा इथं होईल. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज पाच ठिकाणी प्रचासरभा घेणार आहे. औरंगाबादमधील सिल्लोडमधून ते प्रचाराला सुरुवात करतील. त्यानंतर परभणीत त्यांच्या दोन सभा होतील आणि नांदेड तसंच हिंगोलीत एक सभा होईल.. 


तर शरद पवार देखील प्रचारासाठी आज चार सभा घेणार आहेत. अहमदनगरमील अकोले इथं त्यांची पहिली सभा होईल, जळगावात दोन सभा होतील तर एक सभा जालन्यात होईल.