प्रवीण तांडेकरसह मनश्री पाठक, झी २४ तास, मुंबई: कुठल्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते तरीही अद्याप मविआचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. मात्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कुरघोड्याचं राजकारण सुरू झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा ठोकलाय. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय असं नाना पटोलेंनी जाहीर म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून हाणामारी अशी स्थिती झाल्याचं चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात तुरी आणि मुख्यमंत्रीपदासाठी हाणामारी अशी स्थिती सध्या मविआत पाहायला मिळत आहे. मविआत जागावाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखी स्थिती आहे. नाना पटोलेंनी अप्रत्यक्ष का होईना थेट मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकलाय. पटोलेंच्या या वक्तव्याला अनेक संदर्भ आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विकास ठाकरेंनी पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं सांगून मविआत बॉम्ब टाकला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी यांनीही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता.


महायुतीकडून ओबीसींना खूष करण्यासाठी मोठे निर्णय, विधानसभेला फायदा होणार?


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. हौशी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी मात्र काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय वर्तुळात महत्वाकांक्षेची वात पेटवून गेली. त्यापाठोपाठ, बाळासाहेब थोरात आणि वडेट्टीवार यांच्या समर्थकांकडूनही आपले साहेब मुख्यमंत्री व्हावेत असं जाहीर सांगण्यास सुरुवात केली . काँग्रेसकडून उघडपणे मुख्यमंत्री मविआचाच हेच सांगितलं गेलं असलं तरी सध्या काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत.


मविआनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी जाहीर भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. मात्र त्यावर मौन बाळगत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसनं ठाकरेंच्या मागणीला केराची टोपली दाखवली. 


मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्येच मतमतांतरं असल्यानं निकालाआधीच काँग्रेसमधली गटबाजी डोकं वर काढतेय. त्यामुळे हरियाणासारखाच काँग्रेस महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का, अशी भीतीही राजकीय वर्तृळात व्यक्त केली जातेय.