मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरेंचे एक पाऊल मागे?
Uddhav Thackeray CM Face Of Maharashtra: महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन काय चाललंय? जाणून घेऊया.
Uddhav Thackeray CM Face Of Maharashtra: निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महाविकास आघाडीनं संयुक्त पत्रकार परिषद घेतलीय. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून एक सूचक विधान केलंय. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शरद पवार आणि नाना पटोले यांनीही सहमती दर्शवलीय. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? या स्पर्धेत उद्धव ठाकरे आघाडीवर होते. निवडणुकांच्या तारखा कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन काय चाललंय? जाणून घेऊया.
हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर काय घडलंय?
निवडणुकीनंतर कुणाचं सरकार येणार? मुख्यमंत्री कोण होणार ? याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मविआनं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी सातत्यानं उद्धव ठाकरे करत होते. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींसह इतर नेत्यांचीही भेट घेतली. मात्र हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून एक पाऊल मागं घेतल्याचं चित्र आहे.
गद्दारांच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का?
महायुतीनं अगोदर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यानंतर आम्ही जाहीर करू, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. महायुती गद्दारांच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का? असा सवालही उद्धव यांनी विचारलाय.
गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोप
'राज्याच्या जनतेचं हित महत्त्वाचं'
मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्याचा उद्धव ठाकरेंनी आग्रह सोडल्यानंतर शरद पवार आणि नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमती दर्शवलीय. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं नाही, तर राज्याच्या जनतेचं हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शरद पवार आणि नाना पटोले यांनी व्यक्त केली.
महायुती आणि मविआमध्ये जोरदार संघर्ष
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते. सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि मविआमध्ये जोरदार संघर्ष होणार आहे. हरियाणाच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. अशावेळी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून मविआमध्ये वाद होण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी एक पाऊल मागे घेतल्याची शक्यता आहे.
'जाहिरातबाजीऐवजी जनतेच्या सुरक्षेवर पैसे खर्च करा'
भ्रष्टाचारी सरकारविरोधातील आरोपपत्र घेऊन आम्ही जनतेच्या न्यायलयात जाणार आहोत. हे सरकार केवळ जाहिरातबाजीवर पैसे खर्च करतंय. जाहिरातबाजीऐवजी जनतेच्या सुरक्षेवर पैसे खर्च करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.पोलिसांचा उपयोग या गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जातो. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? गद्दारी करुन आलेल्यांना आणि त्यांच्या घरच्यांना किती सुरक्षा आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. 2 ते 3 दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सरकार एका मागोमाग एक निर्णय घेतंय. पण अमंलबजावणी कशी होणार? हे सांगत नाही. महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.