अपहरणाच्या गुन्ह्यानंतर ऐन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार फरार
आता, पोलीस या काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेत आहेत
आशिष अम्बाडे, झी २४ तास, गडचिरोली : गडचिरोलीमध्ये एका काँग्रेस उमेदवारानं पळ काढलाय. निवडणुकीतून नव्हे, खरोखरंच पळ काढलाय... आणि आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गडचिरोलीच्या आरमोरी मतदारसंघात भाजपानं विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना मैदानात उतरवलंय. काँग्रेसनं माजी आमदार आनंदराव गेडाम यांना संधी दिली. या दोन उमेदवारांमध्ये चांगली लढत रंगली होती खरी, पण नंतर 'कहानी में ट्विस्ट' आला.
अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांचं १२ तारखेला अपहरण झालं... त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि पोलीस ठाणं गाठलं. आनंद गेडाम यांचा मुलगा लॉरेन्सनं आपलं अपहरण केल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. त्यानंतर गेडाम पिता-पुत्रांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आनंदराव गेडाम फरार आहेत. खुद्द उमेदवारच गायब झाल्यानं कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अर्थात हा गेडामांविरुद्ध कट असल्याचं निष्ठावंत काँग्रेसीं आणि काँग्रेसचे राज्य सरचिटणीस शहजाद शेख यांना वाटतंय.
या घडामोडींमुळे भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. समोर लढायलाच कोणी शिल्लक नसलं तरी कृष्णा गजबे गाफील नाहीत... त्यांचा प्रचार नियमित सुरू आहे.
आतापर्यंत भाजपा आणि शिवसेनेनं काँग्रेसचे अनेक नेते पळवलेत. मात्र आता उमेदवारावर स्वतःच पळून जायची पाळी आलीय.