हेमंत चापुडे, झी २४ तास, शिरुर-पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि अभिनेते - खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बसला. पंतप्रधानांची पुण्यात सभा असल्यानं ऐनवेळी अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरसाठी अगोदरच रितसर परवानगी घेण्यात आली होती. परंतु, पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे परवानगी मागे घेण्यात आली. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांना पुण्यातील आपल्या तब्बल पाच सभा रद्द कराव्या लागल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार अमोल कोल्हे यांच्या आज राज्यातील विविध मतदारसंघात आठ सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोल्हे यांच्या सकाळच्या सत्रातील तीन सभा सुरळीत पार पडल्या. त्यातील तिसरी सभा ही जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथं झाली.



या सभेनंतर त्यांना पुण्याकडे निघायचं होतं. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. एरंडोल इथून लगेचच गाडीने पुण्यातील पुढच्या नियोजित स्थळी पोहचणंही शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना आपल्या पाचही सभा रद्द कराव्या लागल्या. कोल्हे यांच्या चोपडा, भोसरी, पिंपरी, चिंचवड, खेड पॉईंट इथल्या पाच सभा रद्द झाल्या. 


दरम्यान, पाच वर्षांतलं काम आम्ही पाच महिन्यांत केलं. आता पुढे आम्ही काय करु, याची झलक यावरुन दिसली असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेत म्हटलंय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पुण्यातल्या आठ उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची सभा झाली. यावेळी पंतप्रधानांनी अनुच्छेद ३७० चा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला आणि मोदी मोदी असा गजर सुरू केला. त्यावर पंतप्रधानांनी भाषण थांबवून पोडियमवरून बाजुला जात जनतेला वाकून नमस्कार केला.