विधानसभा निवडणूक २०१९ : राज्यातल्या या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
आपल्या या मेहनतीला फळ येणार की नाही? याची चिंता या पक्षाच्या नेत्यांना लागली आहे
दीपक भातुसे, झी २४ तास, सातारा : विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले असताना, उमेदवारांबरोबर पक्षाच्या नेत्यांची धाकधुकही वाढली आहे. या निवडणुकीत चार प्रमुख पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी हे प्रमुख पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्येक पक्षाने कमी अधिक प्रमाणात या निवडणुकीत मेहनत घेतली आहे. आपल्या या मेहनतीला फळ येणार की नाही? याची चिंता या पक्षाच्या नेत्यांना लागली आहे.
यात भाजपाकडून पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील निवडणुकीत भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा जास्त जागा मिळवण्याच्या इर्षेने मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. निवडणुकीच्या काळात राज्यभरात दररोज ४ ते ५ सभा घेत मुख्यमंत्र्यानी सर्वाधिक ५७ सभा घेतल्या आहेत. उमेदवार निवडीपासून ते संपूर्ण प्रचार यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी स्वत: राबवली. त्यामुळे या निवडणुकीतील यशापयश पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचे असणार आहे.
शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेत लोकशाही नावाला असून सर्व निर्णय आतापर्यंत मातोश्रीवरूनच होत आले आहेत. उमेदवार निवडीपासून ते निवडणुकीतील जबाबदारीचे वाटप आणि प्रचाराची सर्व धुरा उद्धव ठाकरे यांनी पार पाडली. राज्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात ४४ सभा घेतल्या, तर त्यांच्या जोडीला आदित्य ठाकरे यांनी १४ सभा घेतल्या आहेत. राज्यभरात उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी केलेल्या बंडखोरीमुळे इथल्या निकालातही ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय कणकवलीत नारायण राणेंना शह देण्यासाठी भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेनं आपला उमेदवार उभा केला आहे. इथे उद्धव ठाकरेंनी सभाही घेतली होती त्यामुळे या जागेवरही ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीची सर्व धुरा ७९ व्या वर्षी शरद पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. या वयातही दिवसाला ३ ते ४ सभा घेत राज्यभर पवारांनी ४१ सभा घेतल्या. पवारांच्या या सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यात भर पावसात साताऱ्यात पवारांनी घेतलेल्या सभेनं कळस चढवला. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या कामगिरीबाबत धाकधुक आहे. आतापर्यंत अनेक निवडणुका पवारांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना निकालाच्या आधी होत आसणारी धाकधुक तशी नवी नाही. पवारांचा नातू रोहित पवार यावेळी निवडणूक रिंगणात असल्याने त्या निकालाबाबत निश्चितच पवारांच्या मनात धाकधूक असणार.
या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अस्तित्व विशेष जाणवलं नाही. राहुल गांधी यांनी राज्यात केवळ ५ सभा घेतल्या. तर राज्याबाहेरील ज्योतिरादित्य शिंदे, अशोक गहलोत या नेत्यांनी काही सभा घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील काँग्रेसचे नेते आपल्याच मतदारसंघात अडकले होते. काही सभांचा अपवाद वगळता या नेत्यांनी राज्यात सभा घेतल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, हा प्रश्नच आहे... त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे म्हणू शकतो.