नांदेड : शहरात मध्यरात्री गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. लुटमारीच्या उद्देशाने दोन अज्ञात आरोपींनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारचालकांना अडवून गोळीबार केला. यात एका युवकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत एक जण जखमी झाला. पहिली घटना रात्री बाराच्या सुमारास नांदेड लातूर रोडवरील विद्यापीठ रस्त्यावर घडली. त्यानंतर दोन आरोपींनी लातूर फाटा परिसरात आणखी एक कार अडवली. यावेळी केलेल्या गोळीबारात कार चालकावर गोळी झाडली. त्यानंतर कार चालकाला गाडी बाहेर फेकून कार घेऊन आरोपींनी पलायन केले. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.


दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी डॉक्टर सतीश गायकवाड यांची गाडी अडवली. त्यांच्यावर गोळी झाडून आरोपींनी कारची चावी मागितली. घाबरलेल्या कार चालकाने चावी देवून तेथून पळ काढला. नंतर याच दोन आरोपींनी लातूर फाटा परिसरात आणखी एक कार अडवली. या गाडीत अहमदपूर येथील शेख नजीब हा युवक होता. त्याच्या दंडावर आरोपींनी गोळी झाडली. पण गोळी दंडातून छातीत घुसली. नजीबला गाडीबाहेर फेकून त्यांची कार घेउन हे दोन्ही आरोपी फरार झाले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने नजीब यांच्या मृत्यू झाला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.