कल्याण : अवैध मद्यवाहतुकीवर कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवणाऱ्या कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर त्यांच्या कार्यालयासमोर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. तिघांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमधून काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती कल्याण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुनील कणसे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित गाडीची तपासणी केली. आणि कारचालकाला ताब्यात घेत आपल्या कार्यालयात जाण्यास निघाले. 



दरम्यान, मात्र या कार्यालयासमोरच ८ ते १० अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून 'तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच भेटतो का? असे विचारत काठी आणि लोखंडी सळीने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला केला, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. या हल्ल्यात सुनील कणसे यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले.


या सर्व झटापटीत टोळक्याने कारचालकाला घेऊन पोबारा केला. हल्ला करणाऱ्या टोळीतील काही जणांना उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून इतर हल्ला करुन फरार झालेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराजे साळवे यांनी दिली.


6\