शेतकरी संप : साताऱ्यात दूध डेअरीच्या ट्रकची तोडफोड
शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडलीय. साताऱ्यात शेतकरी संघटनेनं कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली.
सातारा : शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडलीय. साताऱ्यात शेतकरी संघटनेनं कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली.
वारणा दूध डेअरीच्या या ट्रक आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर ही घटना घडली. आजपासून राज्यभरात शेतकऱ्यांनी संपाची हाक दिलीय.
गावाकडून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तू पाठवणार नसल्यचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय.
हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.