Chandrakant Bawankule On Atul Parchure Death: अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.  अतुल परचुरे यांनी नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये विविधरंगी भूमिका साकरल्या होत्या. हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट ही सर्वांनाच धक्का देणारी ठरतेय. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.विनोदी ढंगाच्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. अतुल परचुरेंच्या मृत्यूनंतर मनोरंजन तसेच राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत बावनकुळे यांनीदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट लिहिली आहे.


काय म्हणाले बानवकुळे?



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिय अतुल, खरं खरं सांग, आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एक्झिट घेताना तुझ्यावर, तुझ्या नाटकांवर अलोट प्रेम करणाऱ्या, अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस. चटका लावून निघून गेलास, असे चंद्रकांत बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. तुझ्या गालावरची गोड खळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे जड आहे.वेदना देणारे असल्याचे बावनकुळे म्हणाले. मराठी मालिका, नाटके आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही अतुल परचुरे यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्याचे ते म्हणाले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि 'खरं खरं सांग..' या नाटकातून तू पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली... तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभवला आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देवून गेली, असे ते म्हणाले.


'पहिली सर्जरी चुकली आणि त्यानंतर सर्व चुकतच गेलं', अतुल परचुरेंनी सांगितली होती कॅन्सरची आठवण


अतुल परचुरे यांच्याविषयी 


अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केलं. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. अतुल परचुरे यांनी कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकीच्या उपचारांमुळे आपलं आरोग्य आणखी बिघडल्याचं सांगितलं होतं. जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली असं त्यांनी सांगितलं होतं.