गजानन देशमुख, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hingoli News Today: औंढा नागनाथ (Aundha Nagnath) हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे. इथे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्यात तर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. असे असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औंढा नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला मंदिरातून बाहेर जाण्यासाठी भव्य लोखंडी गेट होता. हाच गेट अंगावर पडून एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 


औंढा नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला मंदिरातून बाहेर जाण्यासाठी एक ट्रॉली गेट होता. मागील काही दिवसांपासून तो गेट बंद होता. गेट तुटलेला असल्याकारणाने त्याला मंदिर व्यवस्थापनाने ताराने तात्पुरते बांधून ठेवले होते. हा वजनदार गेट एका दहा वर्षीय बालकाच्या अंगावर पडला. मुलाच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


मयत मुलाचे नाव सोमनाथ अरुण पवार असे असून तो मंदिर परिसरात गंदकरी (भाविकांना गंद, टिळा लावण्याचे काम) होता. काही गंदकरी मुलं मंदिराच्या पूर्व दिशेला वास्तव्यास आहेत. मंदिरात येण्याचा शॉर्टकट मार्ग म्हणून ते या बंद गेटवरून ये जा करीत असत. आज ही गेटवर चढून आत मध्ये येत असतांना हा अपघात झाला असावा, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. हा गेट बालकाच्या अंगावर कसा पडला हा तपासाचा भाग आहे. 


दररोज हजारो भाविक मंदिरात ये जा करत असताना इतका भव्य आणि वजनदार गेट मंदीर व्यवस्थापनाने तात्पुरता तारांनी का बांधला? मंदिराच्या या भागात सीसीटीव्ही कॅमेरे का लावलेले नाहीत?, गेट समोरील पायऱ्यांवर अनेक जण नियमित बसतात. ही मुलंदेखील ही त्या भागात बसत असत अशी माहिती आहे, बालकामगार विरोधी कायदा असतांना या मुलांना गंध टिळा लावण्याची मुभा मंदिर व्यवस्थापनाने का दिली असे एक नाहीतर अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत, त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण आहेत, याचा सखोल तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे अशी चर्चा होत आहे.