`खानासोबत बाण गेला`; भाजपची शिवसेनेवर बोचरी टीका
महाविकासआघाडीचा फॉर्म्युला पुन्हा यशस्वी
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरपदी अखेर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विजयी झाले. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला औरंगाबाद महापालिकेतही यशस्वी झाला. गेली २८ वर्षं औरंगाबाद पालिकेतली शिवसेना-भाजप युती तुटली. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. त्याजागी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौरपदी निवडून आले.
काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष नगरसेवक आणि एमआयएमनं हकालपट्टी केलेले दोन नगरसेवक अशी ५१ मतं मिळवून जंजाळ विजयी झाले. त्यांनी भाजपप्रणित अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, भाजपनं या निवडीवर जोरदार टीका केली. औरंगाबादेत बाण हवा की खान असा प्रचार करणारी शिवसेना आता खानासोबतच गेल्याची खिल्ली भाजपनं उडवली.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं एमआयएममध्ये आणखी फाटाफूट झालीय. उपमहापौर निवडीच्या वेळी गैरहजर राहिलेले ५ नगरसेवक आणि भाजपप्रणित अपक्षाला मतदान करणारा १ नगरसेवक अशा ६ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महापालिकेचं राजकारण चांगलंच रंगतंय. आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी करणाऱ्या शिवसेनेनं आता औरंगाबादमध्ये महाविकास करून दाखवावा, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.