औरंगाबाद : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शिक्षिकेला भर चौकात पेट्रोल अंगावर टाकून जाळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता औरंगाबादमध्ये एका ५० वर्षीय महिलेला गावातील एका व्यक्तीने जाळून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. सिल्लोडमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. महिलेला घरात घुसून जिवंत जाळल्यानंतर संताप आणि चिड व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिल्लोड तालुक्यातल्या  अंधारी गावात ही महिला राहाते. संतोष मोहिते हा रविवारी रात्री तिच्या घरी गेला आणि शरिरसुखाची मागणी करू लागल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे. तिने नकार दिल्यावर संतोषने तिला मारहाण केली आणि घरातले रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला जाळले. ही महिला ९५ टक्के भाजली आहे. संतोष मोहिते गावातच बिअर बार चालवतो, अशी माहिती पुढे आली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 


हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला सोमवारी जाळण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी ही घटना घडली. पण सुरुवातीला तिनेच आत्महत्या केल्याचे सगळ्यांना वाटत होते. मात्र, दोन दिवसांनी ही महिला शुद्धीवर आली, त्यावेळी तिच्या जबाबात हा धक्कादायक प्रकार उघड झाला. महाराष्ट्रात २४ तासांत दोन सावित्रीच्या लेकी पेटवून दिल्याची घटना पुढे आल्यानंतर संपात आणि चिड व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोड शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.