Aurangabad Rename Issue: संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; इम्तियाज जलील म्हणतात...
संभाजीनगरमधल्या MIMच्या आंदोलनात नाचवले औरंगजेबाचे फोटो, नामांतरला विरोध करण्यासाठी MIMचं आंदोलन. औरंगजेबाच्या फोटोवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) यांचा खुलासा.
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटला आहे. औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नामांतराला विरोध करण्यासाठी शहरात MIMचं आंदोलन सुरू आहे. संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयएम आणि काही संघटनां कडून साखळी उपोषणाला सुरु करण्यात आले आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं या नामांतरा विरोधात हे उपोषण आहे. संभाजीनगर नाव आम्हाला मान्य नाही या शहराचं नाव औरंगाबाद रहावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. औरंगाबाद नाव बदलू नये यासाठी औरंगजेबाचे फोटो झळकावल्याचा दावा करण्यात येत आहे. काही उपोषणकर्त्यांनी औरंगजेबांचे फोटो झळकावणाऱ्याला तिथून बाहेर काढले. मात्र यावर आता नवा वाद सुरू झाला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आंदोलनात सहभागी
जवळपास 500 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नामांतरांला आमचा कायम विरोध असेल नामांतर आम्हाला मान्य नाही असं त्यांचं म्हणणे आहे. त्यासाठी या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. खासदार इम्तियाज जलील देखील उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.
इथं हुकूमशाही चालणार नाही. कोणीतरी ठरवले म्हणून आम्ही शहराचे नाव बदलणार नाही. नामांतराला आमचा तीव्र विरोध आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी राजकारण कोण करते हे स्वतः पहावा आणि नंतर माझ्यावर आरोप करावा असे जलील म्हणाले.
औरंगजेबाचे फोटोबाबात जलील याची प्रतिक्रिया
आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकावण्यात आला. औरंगाबाद नावाचं आणि औरंगजेबाचा समर्थनच हा फोटो झळकावताना या आंदोलकांनी केला. आंदोलन सुरू असताना बराच वेळ हा फोटो अशा पद्धतीने झळकावण्यात येत होता. त्यावेळी ना कोणी विरोध केला ना फोटो हटवण्यास सांगितले. मात्र, यावरुन टीका सुरू झाल्यानंतर एमआयएम कडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमचा आंदोलन चिरडण्यासाठी आम्हाला बदनाम करण्यासाठी कुणीतरी आमच्या आंदोलनात हा फोटो झळकावल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. फोटो झळकावणाऱ्याची आम्ही कडक शब्दात निंदा करतो असेही इम्तियाज जलील म्हणाले.
दरम्यान, आता या फोटोवरुन इतर पक्षांनी एमआयएम वर टीका सुरू केली आहे. हे आंदोलन नाटक असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. यांना औरंगजेबाचा इतका पुळका का असावा नाही, ही लोक आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवत नाही तर मग इतक्या औरंगजेबाचा पुळका यांना कशाला असा सवाल खैरे यांनी केला. इम्तियाज जलील यांचा उपोषण म्हणजे नाटक आहे कुणीतरी त्यांना आंदोलनासाठी उकसवलंय. हे बी टीमचं काम असावं असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.