शिर्डीतील साईभक्त आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसंच शिर्डीत ग्रामस्थांनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षांपूर्वी साई मंदिरात फुले, हार आणि प्रसाद आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. कोविडमुळे हे निर्बंध लागू करण्यात आले होते. या बंदीमुळे शिर्डीतील फुलांचे व्यापारी आणि आजूबाजूच्या सुमारे चारशे एकर क्षेत्रात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. बंदी हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केलं होतं. 


या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली होती. साईभक्तांना हार, फुले आणि प्रसाद अर्पण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही सातत्याने होत होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन अभ्यास समितीने आपला अहवाल तयार केला होता. 


समितीच्या अहवालाच्या आधारे साई संस्थानच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी साई संस्थानने न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सर्वांना लवकरच परवानगी मिळेल अशी आशा वाटत होती. त्यातच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने फूल, हार नेण्यास परवानगी दिली आहे.