नागपूर : अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकरणी राज्यसरकारलाही धारवर धरण्यात आले होते. मात्र, सर्व नियमानुसार झाल्याचे स्पष्टीकरण राज्यसरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. मात्र, हे स्पष्टीकरण खोटे असल्याचे पुढे आलेय. अखेर अवनीला ठार मारल्याप्रकरणी NTCA चा अहवाल आलाय. या अहवालात अवनीची हत्या केल्याचंच स्पष्ट होत आहे. दरम्यान, यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता मौन बाळगलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवनी वाघिणीच्या शिकारीप्रकरणी NTCA अर्थात नॅशनल टायगर Conservation अॅथोरिटीचा अहवाल प्राप्त झालाय. २ नोव्हेंबरला यवतमाळमधल्या राळेगावच्या जंगलात अवनी वाघिणीला ठार करण्यात आले होते. अवनीची शिकार नियम धाब्यावर बसवून केल्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. याप्रकरणी वन्यजीवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. 


अवनीला जेरबंद करणं योग्य नियोजनमुळे शक्य झालं असतं, मात्र तसा प्रयत्नच झाला नाही,  तिला ठार मारण्यापूर्वी तिला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. एखाद्या प्राण्याला ठार मारताना पशुवैद्यकीय अधिकारी सोबत असावा लागतो. मात्र अवनीला मारताना हा अधिकारी बरोबर नव्हता, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय.


वाघाला बेशुद्ध करण्यासाठीचे औषध २४ तासच गुणकारी असतं,अवनीला बेशुद्ध करण्यासाठी वापरलेल्या डार्टमधलं औषध ५६ तास आधीचं होते, अशी धक्कादायक माहिती या अहवालातून पुढे आलेय. पशुवैद्यकीय पथक आणि अवनीला जेरबंद कऱण्यासाठी गेलेल्या टीममध्ये समन्वयाचा अभाव होता, असाही ठपका ठेवण्यात आलाय.


अवनीला ठार मारताना इंडियन आर्म्स कायद्याचेही उल्लंघन झाले आहे. अली अजगरनं वापरलेल्या हत्याराचा परवाना शाफत अलीच्या नावावर आहे. शाफत अली तिथे उपस्थित नव्हते. अवनीच्या मृत्यूप्रकरणी NTCA चा अहवाल आल्यावर त्यावर प्रतिक्रिया द्यायला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिलाय. आता अवनीच्या हत्येची जबाबदारी कोण घेणार? शिकारी असगर अलीला शिक्षा होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत.