भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रातील या गावात; फक्त माता जानकीचीच होते पूजा, कारण...
Sita Mandir Maharashtra: महाराष्ट्रात सीता मातेचे मंदिर आहे. या मंदिरात फक्त माता सीतेचीच मूर्ती आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती पुजली जात नाही.
Sita Mandir Maharashtra: सध्या देशात एकच चर्चा आहे ती म्हणजे अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराची. नवीन वर्षांत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून 22 जानेवारी 2024 मध्ये मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. संपूर्ण देशासह जगभरात उत्सवाचे वातावरण आत्तापासूनच पाहायला मिळतेय. अयोध्येत भव्य राम मंदिर होत आहे. पण तुम्हाला हे माहित्येय का संपूर्ण देशात एकमेव असं सीता मंदिर आहे जिथे फक्त माता सीतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या मंदिरात माता सीतेची मूर्ती तर आहे पण मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती नाहीये. महाराष्ट्रातील या गावात हे अनोखे मंदिर आहे. या मंदिराबाबत अधिक जाणून घेऊया.
महाराष्ट्रात आहे मंदिर
भारतातील एकमेव सीता मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यापासून तीन किमी दूर असलेल्या रावेरी गावात आहे. या रावेरी गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे. सीते मातेचे हे एकमेव मंदिर असून मंदिरात फक्त माता सीतेची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती नाहीये. यामागेही एक अख्यायिका सांगितली जाते. श्रीरामाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण माता सीतेला वनवासात सोडून आला. रामायणात उल्लेख असलेले दंडकारण्य म्हणजे महाराष्ट्रातील हाच भाग होय. तेव्हा माता सीतेचे वास्तव्य याच भागात होते. येथेच लव-कुशचा जन्म झाला होता. त्यांनी आपले शिक्षण याच भागात वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात पूर्ण केले होते.
प्रभू श्रीरामांनी जेव्हा अश्वमेघ यज्ञाचा घोडा सोडला होता तेव्हा त्या घोड्याला याच भागात लव-कुशने अडवले होते. त्यानंतर रामांनी या घोड्याला सोडवण्यासाठीी बजरंगबली हनुमानाला त्यांच्या वानरसेनेसह पाठवले होते. तेव्हा लव-कुश यांनी हनुमानालाही बांधून ठेवले होते.ते हनुमानजी या ठिकाणी आजही बांधलेल्या स्थितीत आहेत, अशी आख्यायिका आहे.
स्थानिक ग्रामस्थांनुसार, मंदिरात फक्त सीता मातेची मूर्ती असण्यामागेही एक कारण आहे. सीता मातेची मूर्ती ही अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे की, गरज पडल्यास एक आई एकटीने आपल्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडू शकते.तर, येथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला असे वाटले पाहिजे की आपल्या पत्नीला सांभाळले पाहिजे. या ठिकाणावरून महिला आणि पुरुषांना प्रेरणा मिळेल.
दरम्यान, भारताबरोबरच श्रीलंकेतही सीता मातेचे मंदिर आहे. इथे प्रभू श्रीरामाची मूर्ती नाहीये. श्रीलंकेत असलेले हे मंदिर अम्मा मंदिर नावाने प्रसिद्ध आहे. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा सीता माता त्याच ठिकाणी राहिली होती, अशी मान्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)