शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले? नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य
Union Minister Narayan Rane : अयोध्येतल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यास शंकराचार्यांनी नकार दिला आहे. याबाबत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य समोर आले आहे.
Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. देशभरातून अतिमहत्त्वाच्या लोकांसह हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रिण देण्यात आले आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. दोन शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यावरुन आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शंकराचार्यांवरच निशाणा साधला आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्माला दिलेले योगदान काय? असा सवाल नारायण राणेंनी विचारला आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यास शंकराचार्यांनी नकार दिला आहे. या कार्यक्रमाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत शंकराचार्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता याबाबत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे.. वसईत आयोजित कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्मातील शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शंकराचार्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दलही मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. राम मंदिराच्या काही बाबींवर टीका करण्याऐवजी शंकराचार्यांनी आशीर्वाद द्यावा, असंही नारायण राणे म्हणाले.
काय म्हणाले नारायण राणे?
"इतक्या वर्षांनंतर राम मंदिर बांधले जात आहे. हे काम आजपर्यंत कोणालाही करता आलेले नाही. राम मंदिराचा मुद्दा कोणीही उचलला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आता मंदिर बांधले जात असताना शंकराचार्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. शंकराचार्य मोदीजी आणि भाजपकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहतात पण हा कार्यक्रम धार्मिक आहे. आमच्या धर्माचा आहे," असे नारायण राणे म्हणाले.
"होणाऱ्या मंदिराला शंकराचार्यांनी शुभेच्छा द्यायला हव्यात की त्यांच्यावर टीका करावी. शंकराचार्य भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाहीये. राम आमचं दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे. कितीही दिवस लागू दे पण रामाची मूर्ती जागेवर येतेय आणि आम्हाला नतमस्तक होण्याचं आम्हाला समाधान आहे. शंकराचार्यांनी त्यांचे हिंदू धर्मासाठीचे योगदान सांगावे," असेही नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण अयोध्येला जाणार नसल्याचे चारही शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. प्राणप्रतिष्ठा ही शास्त्रोक्त पद्धत नाही. आपल्या जगण्याचा असा कोणताही अर्थ नाही जिथे शास्त्रीय नियम पाळले जात नाहीत. कारण शास्त्रे सांगतात की, विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा झाली नाही तर देवतेऐवजी भूत, पिशाच, पिशाच, इत्यादींचा समावेश मूर्तीत होतो. अशा अशास्त्रीय सोहळ्यात टाळ्या वाजवायला कशाला जायचं? हे एक राजकीय कार्य आहे. सरकारने याचे राजकारण केले आहे, असे शंकराचार्यांनी म्हटलं होतं.