सुनील दत्त यांच्या ओळखीनंतर सिद्धिकी यांचं नशिब फळफळलं; बाबा सिद्दिकी यांचा बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास
सहा वर्षाचे असताना बाबा सिद्दिकी त्यांच्या वडिलांसोबत बिहारमधून मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. मुंबईनं बाबा सिद्दिकी यांना भरभरून दिलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मुंबई पालिकेचे नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा बाबा सिद्दीकींच्या प्रवास हा संघर्षमय होता.
Baba Siddique Murder Case : दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. आरोपींनी त्यांच्यावर 3 राऊंड फायर केले. त्यांच्या छातीत एक गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नुकतेच बाबा सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, अजित पवारांच्या पक्षात दाखल झाले होते. राजकारणी असलेले बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवुडशीही चांगले संबंध होते. यामुळे बॉलिवुलडलाही या घटनेनं मोठा धक्का बसला. जाणून घेऊया बाबा सिद्दिकी यांचा बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनेकांची कारकीर्द घडली.. त्यातलेच एक बाबा सिद्दीकी.. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बिहारच्या गोपाळगंजमधून बाबा सिद्दीकींनी मुंबई गाठली.. राजकारणात प्रवेश केला आणि स्वत:चा दबदबा निर्माण केला.. ज्या शहरात कारकीर्द घडली त्याच मुंबईत बाबा सिद्दीकींची हत्या झाली.. राजकीय नेत्यांपासून ते बॉलीवूड कलाकार.. सर्वच जण बाबा सिद्दीकींच्या हत्येने हळहळले..
बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास
झियाउद्दीन हे बाबा सिद्दीकींचं मूळ नाव आहे. बाबा सिद्दिकी वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांसोबत मुंबईत आले. त्यांचे वडील अब्दुल रहीम सिद्दीकी यांच्यासोबत ते घड्याळं दुरुस्त करण्याचं काम करत..बाबा सिद्दिकींचं शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले- त्यांनी एमएमके महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असतानाच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. 1977 पासून काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम केलं. 1988 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. सुरूवातीपासूनच बाबा सिद्दिकी काँग्रेसमध्ये होते. मात्र,काँग्रेस नेते सुनील दत्त यांच्या ओळखीनंतर सिद्धिकी यांचं नशिब फळफळलं.सुनील दत्त यांना बाबा सिद्दिकी आपले राजकीय गुरू मानायचे बाबा सिद्दिकी हे 1993 आणि 1998 साली मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सुनील दत्त यांच्या शिफारशीवरूनच बाबा सिद्दिकी यांना आमदारकीचं तिकीट देण्यात आलं. 1999 साली वांद्रा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. 2004 आणि 2009 मध्येही वांद्रा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले. बाबा सिद्धिकी अन्न आणि कामगार राज्यमंत्रीही होते.. मात्र 2014 च्या निवडणुकीत बाबा सिद्दीकींचा पराभव झाला.
मुंबईतील अल्पसंख्याक समाजाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशी बाबा सिद्दीकींची ओळख... सिनेजगतातील जवळपास सर्वच कलाकारांसोबत त्यांची उठबस होती.. बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार वांद्रयात राहतात. आमदार असल्यानं बाबा सिद्दिकी यांची बॉलिवूडमधल्या स्टारसोबत ओळख वाढली. त्यांच्याकडे सिलिब्रिटींचं येणं जाणं वाढल. दरवर्षी रमजानमध्ये बाबा सिद्धिकी इफ्तार पार्टीही आयोजित करत असत. या इफ्तार पार्टीत शाहरूख आणि सलमानसारख्या सुपरस्टारसह अनेक राजकीय नेते हजेरी लावत असत. बाबा सिद्दीकी यांनी शाहरूख आणि सलमानमधील वादही मिटवला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये बाबा सिद्दीकींनी काँग्रेस सोडली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मुंबईत आलेल्या बाबा सिद्दिकींना मुंबईनं सर्व काही दिलं. मात्र, याच मुंबईत त्यांची हत्याही झाली..