Big Update On Baba Siddique Murder Case: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याचं नाव चर्चेत आलं आहे. बाबा सिद्दीकींचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी या प्रकरणामध्ये आपला जबाब नोंदवला आहे. विशेष म्हणजे सिद्दीकींच्या हत्येमागे अभिनेता सलमान खानशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा करत बिश्नोई टोळी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र झिशान यांच्या जबाबामध्ये बिश्नोई टोळीचा उल्लेख नाही. तरीही या प्रकरणात ज्या भाजपा नेत्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्याने यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलं आहे.


कधी झालेला हल्ला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली. 12 ऑक्टोबर 2024 रोजी झिशान सिद्दीकींच्या कार्यालयासमोर झालेल्या गोळीबारामध्ये 66 वर्षीय बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकींनी जबाब नोंदवला आहे.


झिशान सिद्दीकींनी जबाबामध्ये काय म्हटलंय? 


आपल्या वडिलांवरील हल्ल्याचा संबंध भारतनगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी असल्याची शंका झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे. झिशान यांच्या जबाबात बिश्नोई गँगचा कोणताही उल्लेख नाही. वडिलांच्या हत्येला एसआरए पुनर्विकास प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोप झीशान यांनी केला आहे. तसेच झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात वडिलांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. वडिलांच्या या डायरीमध्ये भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचं झिशान यांनी म्हटलं आहे. 


'त्या' भाजपा नेत्याने नोंदवली पहिली प्रतिक्रिया


झिशान सिद्दिकी यांनी जबाब नोंदविल्यानंतर भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया नोंदली आहे. आम्ही 15 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, नेहमी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, असं कंबोज यांनी बाबा सिद्दीकींसंदर्भात म्हटलं आहे. मात्र त्यांच्या हत्येनंतर मला मोठा धक्का बसला होता, असंही कंबोज यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. 


"बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते. आम्ही मागील 15 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होते आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर कायम बोलायचो. ज्यामध्ये निवडणुकीच्या विषयांचाही समावेश होता. जेव्हा ही घटना (बाबा सिद्दीकींवर प्राणघातक हल्ला झाला) घडली तेव्हा मला धक्का बसला होता. मी या कठीण काळात रुग्णालयात त्यांच्या कुटुंबासोबत होतो. त्यांचा मृत्यू हा सर्व मित्रांसाठी मोठा धक्का होता. सत्य समोर आलं पाहिजे आणि या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे," असं कंबोज यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.