अमरावती: राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली झाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. ते शनिवारी चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कृषी खात्याला खडे बोल सुनावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बच्चू कडू यांनी थोपटली केंद्र सरकारची पाठ, म्हणाले...

काही दिवसांपूर्वीच बोगस बियाणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यामधून शेतकरी सावरत नाही तोच अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र, सरकार किंवा कृषी खात्याकडून त्यांची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. ही परिस्थिती पाहून बच्चू कडू यांनी कृषी खात्याला धारेवर धरले. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आता कृषी खात्याकडून या समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी किसान रेल्वे सुरु केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले होते. किसान रेल ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी  ९०% नाही पण किमान १०% तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. यासोबतच मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र ,आणि कोकण या भागांतूनही एक एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. जर प्रत्येक भागातून अशी रेल्वे सुरू झाली तर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.