Badlapur School Case: बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी बदलापूर प्रकरणाचासंदर्भ देताना अशाच एका प्रकरणात आमच्या सरकारने अवघ्या दोन महिन्यांमध्ये आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवल्याचं विधान केलं आहे. मात्र हे प्रकरण नेमकं कोणतं? ही फाशी कुठे देण्यात आली असा सवाल आता महाविकास आघाडीचे नेते विचारु लागले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबरच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर यावरुन लक्ष्य केलं आहे.


मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाडकी बहीण कार्यक्रमात भाषण देताना, "महाराष्ट्रात ते म्हणत होते की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यापूर्वी, तीन-चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर. आम्ही त्याला फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवलं, सगळे पुरावे दिले. पोलिसांनी जी सगळी मेहनत केली. या केसला दोन महिने लागले आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली. हे आमचं सरकार आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे.


जाहीर सभेत मुख्यमंत्री जनतेशी खोटं बोलले


"महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवतात, याचा पुरावा!" अशा मथळ्याखाली वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलातना वडेट्टीवार यांनी, "शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी," अशी मागणी केली आहे. "हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त एसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का? कारवाई होते का?" असा सवालही पोस्टमध्ये केला आहे. "मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री महोदय, बलात्कारसारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय तरी घेऊन नका!" असा खोचक टोला पोस्टच्या शेवटी वडेट्टीवार यांनी लगावला आहे.



राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल


विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या पोस्टवरुन पत्रकारांनी संजय राऊतांना सावला केला असता, "मुख्यमंत्र्यांनी कुठे फाशी दिली? कोणत्या न्यायालयात खटला चालला? कोणत्या कारागृहात संबंधित आरोपीला फाशी दिली? या साऱ्याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणे आवश्यक आहे," असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "महाराष्ट्रापासून तुम्ही काही लपवत आहेत का? वर्षा बंगल्यामागे फाशी दिली की राजभवनामागे फाशी दिली हे त्यांनी सांगा," असंही राऊत म्हणालेत. "मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य राज्यपालांनी गांभीर्याने घेवून त्याची चौकशी करावी असं, आमचं आवाहन आहे. मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का?" अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे.


अन्य योजनांचा निधी थांबवल्याचा आरोप


लाडकी बहीण योजनेवर बोलताना संजय राऊत यांनी, "इतर अनेक योजना रखडल्या आहेत. मुलांच्या आश्रम शाळेच्या निधीमध्ये घट करण्यात आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल," असा टोला राऊतांनी लगावला.