Badlapur School Sexual Assault Case: छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 'या दूर्घटनेमधून काहीतरी चांगले घडावे,' असं विधान केल्याने वाद निर्माण झालेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील आमदार संजय गायकवाड यांनी बदलापूरमधील लैंगिक छळ प्रकरणाबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. मुख्यमंत्री राज्यातील प्रत्येक शाळेवर पहारा देणार का? असा अजब सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित करत सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांसमोर केला. विरोधकांनी बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन केलेल्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाड यांनी हे विधान केलं. 


बलात्कारी फोन करुन येतो का? गायकवाड यांचा सवाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाड यांनी, "मी काल आंदोलन पाहिलं. सगळे पक्ष त्याच्यावर (बदलापूर घटनेवर) थयथयाट करुन राहिले होते. ही प्रवृत्ती असते. या हरा*खोर नराधमांना मुलीचं वय समजत नाही आणि ते त्यांच्यावर अत्याचार करतात. आता हे सगळे लोक सरकार... सरकार... सरकारने केलं. अरे आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये जाऊन पाहरा देणार का? की पोलीस निरिक्षक त्याच्या घरी जाऊन बसणार आहे? की आरोपी फोन करुन सांगतो की, मी बलात्कार करतोय, ये तू मला पकडायला ये... असं सांगतात का ते?" असा विचित्र युक्तीवाद प्रसारमाध्यमांसमोर केला. "घटना घडल्यानंतर यंत्रणा काम करत असते. पोलीस तपास करतात. त्यांना नाही जमलं तर सीबीआय आहे. सीबीआय नाही झाले एसआयटीवाले करतात. पण आरोपीला सोडत नाहीत. सरकार कारवाई करत नसेल, कोणाला पाठीशी घालत असेल तर रस्त्यावर उतरा," असं संजय गायकवाड म्हमाले. 


कधी नाही ते 'मातोश्री'मधले पावसात बाहेर


"आरोपींना शिक्षा कशी मिळेल याचा सर्वांना प्रयत्न केला पाहिजे. मात्र हे होताना दिसत नाही. कुठलीही घटना झाली की राजकारण. काधी नाही ते आम्ही 'मातोश्री'मधले पावसामध्ये बाहेर येताना आम्ही पाहिले. आलंही पाहिजे ही घटना तशी आहे. मात्र सरकार आणि पोलीस खातं कारवाई करत नसेल तर नक्की रस्त्यावर उतरा. पण सगळी कारवाई सुरु असताना विनाकारण अशाप्रकारेचं नाटक करणं शोभत नाही," असंही संजय गायकवाड म्हणाले. 


पोरं पैदा झाली नाही तरी सरकारला दोष देतील


विरोधकांवर निशाणा साधताना पोरं झाली नाही तरी सरकारला दोष देतील असं विधान संजय गायकवाड यांनी केलं. "कुठं काहीही झालं की राजीनामा. माझा तर असा आरोप आहे की यांच्या घरात पोरं पैदा झाली नाही तर ते ही म्हणतील की सरकारमुळे होत नाहीत," असं विधान संजय गायकवाड यांनी केलं.