Badlapur School Crime News: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे यांच्याबाबत आणखी एक संतापजनक माहिती समोर येत आहे. यामुळं पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. नराधम अक्षय शिंदे याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील आणखी एका मुलीवर त्याने अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नव्या माहितीने संपूर्ण शहर पुन्हा एकदा हादरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापुरातील नामांकित शाळेत शिकत असलेल्या दोन मुलींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. चिमुकलींनी घरी हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले तिथे गेल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. या घटनेनंतर पालकांनी पोलिसांत धाव घेतली मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करण्यात आल्याचे समोर आले. तसंच, शाळा प्रशासनाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली नाही. या सगळ्या घटनानंतर पालकांनी संताप व्यक्त करत शाळेसमोर आंदोलन केले. या आंदोलनात समस्त बदलापूरकरदेखील सामील झाले होते. पालकांच्या आक्रोशानंतर बदलापूर अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली व तापासासाठी SIT स्थापन करण्यात आली. 


बदलापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे गेल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एसआयटीला आधीपासूनच अक्षय शिंदे यांनी आणखी काही चिमुरडींवर अत्याचार केल्याचा संशय होता. त्यानुसार त्यांनी पालकांना समोर येण्याचे अवाहनदेखील केले होते. एसआयटीच्या तपासातच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अक्षय शिंदे याने शाळेतीलच आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी कडून नराधम अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अक्षय शिंदे याला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या नवीन धक्कादायक खुलाश्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 


दरम्यान, नराधम अक्षय शिंदे हा 15 दिवसांपूर्वीच शाळेत रुजू झाला होता. त्यामुळं आरोपीने आणखी काही मुलींसोबत असे प्रकार केले  असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. त्यामुळे  शाळेतील आणखी काही  मुलींसोबत असे प्रकार झाले असल्यास समोर या असे आवाहन करणारे मेसेज तपास यंत्रणांनी शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना पाठवले होते. त्यानंतर काहीच दिवसांत हा खुलासा झाला आहे.