Badlapur Sexual Assault Case: माझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवाल
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे चकमक प्रकरणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता शिंदेच्या आईनेदेखील एक आरोप केला आहे.
Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र, आता या प्रकरणात अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवरच आरोप केले आहे. माझ्या मुलाने कधी फटाकडी वाजवली नाही तो बंदूक कसा धरेल, असं शिंदेच्या आईने म्हटलं आहे.
प्रकरण दाबण्यासाठी अक्षयचा वापर करण्यात आला आहे. माझा मुलगा बंदूक कसा धरेल. माझ्या मुलाने आत्तापर्यंत कधी साधी फटाकडीपण वाजवली नाही. त्याला गाडी पण चालवता येत नाही. तो कसा बंदूक धरेल. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं अक्षय शिंदेच्या आईने म्हटलं आहे.
आम्ही घटनेच्या दिवशीच त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तो माझ्याशी बोलला. मला कधी सोडवणार हे तो शेवटचं बोलला होता. तेव्हा मी त्याला बोलली एक महिना थांब. वकिलाला विचारतो. त्याने एक चिठ्ठी लिहून दिली होती त्या अकाउंटमध्ये पैसे टाका इथपर्यंत त्याने आम्हाला सांगितलं. त्याने एक पेपरपण दिला होता वाचायला. त्यावर काय लिहलंय हे वाचायला सांगितलं होतं. मला मला ते वाचता आलं नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं कोणी काही दिलं असेल ते फेकून दे. त्या कागदावर काय लिहलं आहे, हे आम्हाला समजलंच नाही, असाही दावा त्यांनी केला आहे.
अक्षयच्या मृत्यूला पोलिस प्रशासन जबाबदार आहे. आम्हाला न्याय पाहिजे. दबावातूनच त्याच्याकडून गुन्हा कबूल करुन घेण्यात आला. पोलिसांनीच मारलं आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका अक्षयच्या पालकांनी घेतली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याची पोलिस कोठडी सोमवारी संपली होती. त्याला कोर्टात हजर केले जात होते. अक्षयची पहिली पत्नी हिने त्याच्यावर नैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच चौकशीसाठी त्याला ठाणे क्राइम ब्रँच तळोजा जेलमधून बदालपूर येथे घेऊन जात असतानाच अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून तीन राउंड फायर केले. पोलिस अधिकारी निलेश मोरे यांच्यावर त्याने गोळी झाडली. या झटापटीत पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता. त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.