महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात
पहिल्यांदाच पाच नेत्यांची कार्याध्यक्षपदी देखील नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या फळीतील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्ली. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनीही आपापले राजीनामे सादर केले. सध्या काँग्रेसमध्ये अध्यक्ष पद ही रिक्त आहे. त्याचसोबत अनेक प्रदेशाध्यक्ष पद भरणेही महत्त्वाचे आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय पहिल्यांदाच पाच नेत्यांची कार्याध्यक्षपदी देखील नेमणूक करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी ही घोषणा केली. नव्या कार्याध्यक्षांमध्ये डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे.