बाळासाहेब थोरातच तेव्हा भाजपमध्ये जाणार होते; विखेंचा गौप्यस्फोट
बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाचा फुटबॉल झाला आहे.
अहमदनगर: दोन वर्षांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेच भाजपमध्ये जाण्याच्या तयारी होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. ते शनिवारी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले की, बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कुणाकुणाच्या भेटी घेतल्या त्याची माहिती माझ्याकडे आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी थोरातांनी काँग्रेसची फरपट केली आणि पक्ष दावणीला बांधला. आता ते केवळ नशीबामुळे सत्तेत बसले आहेत. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाचा फुटबॉल झाला आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
थोरातांचा राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला, 'मी पळून गेलो नाही'
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यांनी नुकतीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांची भेटही घेतली होती. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांना टोला लगावला होता. 'जिथं गेला तिथं सुखाने नांदा, असे त्यांनी विखे-पाटलांना उद्देशून म्हटले होते.
'स्टेजवर बसणाऱ्या विखे-पाटलांना आता चौथ्या-पाचव्या रांगेत बसावे लागतेय'
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या या टीकेला आज विखे-पाटलांनी प्रत्युत्तर दिले. अहमदनगरमध्ये १२ जिल्ह्यांपैकी यांना अवघ्या तीन जागा लढवता आल्या. त्यातच यांना कसेबसे यश मिळाले. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाची काळजी करु नये. विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये हेलिकॉप्टर आणून ठेवले होते. मात्र, त्यांना स्वत:चा मतदारसंघ सोडून प्रचारासाठी बाहेर जाताच आले नाही, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.