चंद्रपूर : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला महाराष्ट्रासह देशभरातच पराभव स्वीकारावा लागला आहे. परंतु चंद्रपूर मतदारसंघातून भाजपाला धक्का बसला आहे. चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर विजयी झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचा एकमेव विजयी उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. या विजयानंतर चंद्रपुरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळू धानोरकर आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदार पदाचाही राजीनामा दिला. काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी चंद्रपुरातून भाजपाच्या तगड्या उमेदवाराला त्यांनी चांगलीच टक्कर दिली.


चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपमध्ये मोजणी सुरु झाल्यापासूनच चढा-ओढ होती. अखेर काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी बाजी मारली. सुरेश धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७ मते मिळाली तर हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४ इतकी मते मिळाली.


२००४ नंतर काँग्रेसने प्रथमच येथे विजय मिळवला असून बाळू धानोरकर चंद्रपुरच्या मतदारसंघातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत.