यंदा बाळुमामाच्या नावाचा गजर न्हाई; भंडारा उत्सवाबाबत मोठा निर्णय
राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत
कोल्हापूर : राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूरातील प्रसिद्ध बाळुमामाचा भंडारा यंदा रद्द करण्यात आला आहे.
कोल्हापूरात चार राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने बाळूमामाचा भंडारा साजरा केला जातो. परंतु सध्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करता. आदमापूर येथील देवालय समिती आणि ग्रामस्थांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ५ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान होऊ घातलेला बाळुमामाचा भंडारा उत्सव रद्द करण्यात आला आहे.
या उत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविक श्री क्षेत्र अडमपुरात येत असतात. कोरोनाचा प्रसार पुन्हा जोरदार सुरू झाल्याने बाळुमामाचा भंडारा उत्सव होणार की नाही याकडे भाविकांचे लक्ष लागले होते.
त्यामुळे भक्तांच्या आरोग्याला कोरोना संसर्गाचा धोका पोहचू नये यासाठी आदमापूर देवालय समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यानंतर बाळुमामाचा भंडारा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.