केळीच्या खोडापासून बनवली पोषक पावडर
केळीचं उत्पादन घेतल्यांनंतर त्याचं खोड वाया जातं... पण त्याच वाया जाणा-या खोडापासून एक उत्तम उपाय जळगावात शोधण्यात आलाय.... जर या प्रयोगाला मान्यता मिळाली, तर कुपोषणावर मात करण्यासाठी ते चांगलं औषध ठरणार आहे....
विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : केळीचं उत्पादन घेतल्यांनंतर त्याचं खोड वाया जातं... पण त्याच वाया जाणा-या खोडापासून एक उत्तम उपाय जळगावात शोधण्यात आलाय.... जर या प्रयोगाला मान्यता मिळाली, तर कुपोषणावर मात करण्यासाठी ते चांगलं औषध ठरणार आहे....
जळगाव जिल्हा केळीच्या उत्पादनात अग्रेसर..... इथल्या प्रसिद्ध केळ्यांसाठी जळगावला जीआयचा टॅगही मिळालाय. केळ्यांचे घड तयार झाले की खोडाचा तसा फायदा होत नाही. या खोडापासून धागा तयार करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पण तेवढा उपयोग वगळता खोडाचा विशेष फायदा होत नाही.
केळीचा हंगाम संपल्यानंतर केळी उत्पादक शेतकरी खोडं बांधावर फेकून देतात. पण वाया जाणाऱ्या केळीच्या खोडामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, साखर, सोडियम आणि शरीराला फायदेशीर असणारे इतर घटक आढळून येतात. जळगावच्या संशोधक डॉ. तेजोमयी भालेराव यांनी वाया जाणाऱ्या केळीच्या खोडापासून एक पावडर तयार केलीय. राज्यातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी ही पावडर प्रभावी असल्याचा दावा भालेराव यांनी केलाय. वापसीच्या केळीपासूनही त्यांनी मुलांना पोषक असणारा एक ज्यूस तयार केलाय.
जळगावातल्या लीलावती संशोधन केंद्रात केळीच्या खोडापासून ही पावडर तयार करण्यात आलीय. या संशोधनाचा फायदा व्हावा यासाठी सध्या भालेराव आणि त्यांच्या सहका-यांचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाला मान्यता मिळाली की महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संशोधन पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
केळीचा हंगाम संपल्यावर शेतातून केळीचं खोड काढून फेकलं जातं. त्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागतो. परंतु शासनाने या संशोधनाला चालना दिली तर शेतकऱ्यांचा खर्चही वाचेल, या खोडामुळे दोन पैसेही मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुपोषणावर मात करणारं हे मल्टिव्हिटॅमिन औषध आदिवासींसाठी वरदान ठरेल.