नुसती कारवाई नाही तर XXX लावणार; नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अश्लील भाषेत बॅनरबाजी
कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी बॅनरद्वारे सूचना केल्या जातात. बऱ्याचदा गमतीशीर पद्धतीने देखील समज दिली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अश्लील भाषेत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : कचरा टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था अनोख्या पद्धतीने बॅनरबाजी करतात. अनेक सोसायट्यांमध्ये असभ्य भाषेत लिहीले बोर्ड लावले जातात. असे अनेक बॅनर सोशल मिडियावर व्हायरल होतात. नवी मुंबईत ही अशाच प्रकारची बॅनरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे. या बॅनरवर असभ्य आणि अश्लिल भाषेत कचरा टाकणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. या बॅनरबाजीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करण्यात आला आहे. यामुळे हे बॅनर नवी मुंबई महापालिकेमार्फत लावण्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकरणी नवी मुंबई महापालिकेने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे (Navi Mumbai Municipal Corporation).
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात लागले बॅनर
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 परिसरातील उद्यानात हे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर नवी मुंबई महानगरपालिकेचे नावं आणि बोधचिन्ह वापरून अश्लिल भाषेत धमकी देण्यात आली आहे. येथे कचरा टाकल्यास कारवाई नाही तर थेट घोडा लावण्यात येईल अशा असभ्य भाषेत मजकूर छापण्यात आला आहे.
बॅनर पाहून नागरीक हडबडले
उद्यानात लावलेल्या या बॅनरवरील मजकूर वाचून नागरिक हडबडले. यानंतर नागरिकांनी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडे या बॅनरबाबत विचारणा केली. मात्र, नवी मुंबई महापालिका प्रशासनामर्फत अशा कोणत्या प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने तात्काळ हे बॅनर हटवले आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात बॅनर लावणाऱ्या अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हफ्ता देण्यास नकार देणाऱ्याला गावगुंडाची जबर मारहाण
नवी मुंबईत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लहान विक्रेत्यांकडून हप्ता वसुली सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील महापे येथे वडापावचा स्टॉल लावून उदरनिर्वाह करणाऱ्या इसमास तेथील स्थानिक गावगुंड महेंद्र पाटील उर्फ मोट्या याच्या मार्फत हफ्त्याची मागणी करण्यात आली. हफ्ता देण्यास नकार दिल्याने या गावगुंडाने नागेश लिंगायत याला गाठून जबर मारहाण केली. नागेश याच्या डोक्यावर दगड फेकून जीवे जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महेंद्र पाटील याला अटक केली आहे. मारहाणीचा प्रकार सिसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. अशा प्रकारे हप्ता वसुली करणाऱ्या गावगुंडाना न घाबरता पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.