जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : बारामतीमध्ये (Baramati) एका रस्ते अपघाताने दोन शाळकरी मुलांचा बळी घेतला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. सकाळी शाळेत जात असतानाच भरधाव कारने तिन्ही मुलांना उडवले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Baramati Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील चारचाकीने शाळेत जात असलेल्या तीन शाळकरी मुलांना धडक दिली. या अपघातात ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर ही दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली आहेत. या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे. जखमी संस्कारला उपचारांसाठी गिरीराज रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.


नेहमीप्रमाणे ओंकार, रुपेश आणि संस्कार हे तिघेही शाळेत जात होते. त्यावेळी जळगाव कडेपठार गावामध्ये पुणे बारामती रस्त्यावर मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या कारने (एमएच 24- सी- 8041) शाळेत जाणाऱ्या तिन्ही शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती यामध्ये कारचा पुढचा पत्रा चेपला आहे. तिन्ही मुलांना कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहनाला धडकली.


त्यावेळी मराठा मोर्च्यासाठी पोलीस बंदोबस्तावर असलेल्या प्रवीण वायसे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे व अमोल राऊत या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खासगी वाहनातून बारामतीच्या गावडे हॉस्पिटलमध्ये तिघांना दाखल केले. मात्र त्यातील ओंकार खांडेकर व रुपेश खांडेकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संस्कार यास गिरीराज रुग्णालयाच उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.