अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बारामती लोकसभेची निवडणुकीत रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी तगडी लढत होणार आहे. बारामतीमधल्या नणंद भावजय लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बारामतीमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. दुसरीकडे बारामतीमध्ये फक्त लोकसभेच्या जागेसाठीच नव्हे तर प्रचारसभेच्या जागेवरून देखील दोन पवारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक निवडणुकीत बारामतीतील प्रचाराची सांगता शरद पवारांच्या सभेनं होत असते. आधी स्वतःसाठी आणि पुढे लेक सुप्रिया सुळे साठी शरद पवार सभा घेत आलेले आहेत. ख्रिश्चन कॉलनीतील कॅनॉल लगत असलेल्या मैदानावर ही सभा होत असते. शरद पवारांचा हा शिरस्ता किंवा परंपरा म्हणता येईल. असं असताना यावेळच्या निवडणुकीत शरद पवारांना या सभेसाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे. कारण ख्रिश्चन कॉलनीतील मैदान अजित पवारांनी आधीच बुक करून ठेवलंय. त्यामुळे या मैदानावर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता होणार हे स्पष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हेच समारोपाचं भाषण करणार हेदेखील स्पष्ट आहे.


अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवारांना समारोप सभेसाठी बारामतीमध्ये दुसरी कुठलीतरी जागा शोधावी आणि मिळवावी लागणार आहे. 7 मे रोजी बारामती लोकसभेसाठी मतदान आहे. 5 मे रोजी या ठिकाणचा प्रचार संपणार आहे. दुपारी 4 च्या दरम्यान समारोपाच्या सभा होतील. अजित पवारांची सभा कुठे होणार हे तर निश्चित झालंय. मात्र शरद पवारांची तुतारी कुठे वाजणार त्याबद्दल उत्सुकता आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी म्हणजेच बारामतीवर पुरता कब्जा मिळवण्यासाठी अजित पवारांची यंत्रणा कशा पद्धतीने काम करतेय हेदेखील या निमित्तानं अधोरेखित झालंय.


दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कण्हेरीच्या मारुती मंदिरात होणार प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ,सुप्रिया सुळे , आमदार रोहीत पवार कार्यकर्त्यांना मार्गशन करणार आहेत. प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ प्रसंगी आमदार रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार त्यांचे बंधू रणजित पवार ,उपमख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार मुलगा युगेंद्र पवार  एकूणच संपूर्ण पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थीत आहेत.