Baramati MP Supriya Sule Help ST Bus Passengers: महाराष्ट्र परिवहन सेवेतील एसटी बस अचानक बंद पडल्याने रस्त्यावर अडकून पडलेल्या प्रवाशांना शनिवारी बारामती मतदारसंघाच्या खासदार (Baramati MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मदत केली. सुप्रिया सुळेंचा ताफा भोर तालुक्यातील दौऱ्यावर जात असताना त्यांना रस्त्यात एक शिवशाही बंद पडल्याचं दिसलं. यानंतर त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि या प्रवाशांची चौकशी केली. भरदुपारी ही बस मध्येच बंद पडल्याने अनेक प्रवाशी उन्हात ताटकाळत उभे होते. सुप्रिया सुळेंनी या सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसने पाठवण्यासंदर्भातील व्यवस्था केली. इतकेच नाही तर काही प्रवाशांना त्यांनी स्वत:च्या ताफ्यातील गाड्यांमधून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत सोडलं. तसेच आपल्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांना आणि पोलिसांना या प्रवाशांची जाण्याची सोय होईपर्यंत त्यांच्यासोबतच थांबावे असे निर्देश देऊन प्रवाशांची सोय करुन दिल्यानंतर सुप्रिया सुळे पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या.


प्रवासी उन्हात थांबलेले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं यासंदर्भातील पोस्ट सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. "आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हात थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. 


प्रवाशांना दुसऱ्या गाडीत बसून देण्याची व्यवस्था


तसेच, "काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.


गाड्या बंद पडण्याचं प्रमाण वाढलंय...


"यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले. एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परिवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे," असं आपल्या पोस्टच्या शेवटी सुप्रिया यांनी म्हटलं आहे.



कौतुक आणि टिकाही


सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओ खाली त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर विरोधकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंना लक्ष्य केल्याचं दिसत आहे.