बारामती : बारामतीत पोलिसांनी एका सीआरपीएफ जवानाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्दीतील सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. शोकसभेसाठी परवानगी घेण्यासाठी हा जवान आला होता. मात्र दुचाकीवरून तिघे आले त्याचा जाब विचारत पोलिसांनी अशोक इंगवले या सीआरपीएफ जवानाला खोलीत डांबून मारहाण केली. विशेष म्हणजे त्याच्यासोबत असलेले माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेनंतर बारामती पोलीस ठाण्यात युवकांनी गर्दी केली. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करू, असं पोलिसांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवरून पोलिसांवर टीका केली आहे.  पोलिसांना जवानांना मारण्याचे अधिकार दिले आहेत का? दोषींना योग्य धडा मिळाला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नाही. अवैध धंदे चालतात त्यावर कारवाई करावी. चुकीच्या प्रवृत्तीवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. तसंच नको तिथे पोलिस अधिकाराचा गैरवापर कशासाठी?, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. हे शरमेने मान खाली घालायला लावणारं कृत्य असल्याचं अजित पवार म्हणाले.