कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान
Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project ) विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu : कोकणात आज राजापूर तालुक्यातील नियोजित बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन ( Barsu Refinery Project ) राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केलीय. दरम्यान, त्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
कोकणात बारसू प्रकल्प नको, अशी येथील जनतेची मागणी आहे. राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांनी तीन दिवस आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी धरपकड करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ताब्यात घेतले होते. तर काही आंदोलक नेत्यांना अटक केली होती. त्यामुळे या आंदोलनात ठाकरे गटाने उडी घेतली.
नारायण राणे काढणार महामोर्चा
दुसरीकडे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे हेही महामोर्चा काढणार आहेत. यात राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राणे यांचे दोन्ही चिरंजीव नीलेश आणि आमदार नितेश राणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे बारसूत ठाकरे आणि राणे आमनेसामने उभे ठाकलेले पाहायला मिळतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाकरे - राणे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकणार?
उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर जिथे उतरणार आहे, त्याच हेलिपॅडपासून राणे यांच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं ठाकरे विरुद्ध राणे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. राणे स्वतः मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याने बारसूत वातावरण तापण्याची शक्यता आहे. आम्ही प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी बारसूत जाणार आहोत, मला तो प्रकल्प कोकणात हवा आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली आहे. दीड लाख कोटी रुपये त्या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. तरुण-तरुणींना त्या प्रकल्पातून नोकऱ्या मिळणार आहेत, असा दावा राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे साधणार स्थानिकांशी संवाद
रिफायनरी विरोधात स्थानिक लोक एकवटले आहेत. दरम्यान, मुंबईत मातोश्रीवर जाऊन प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी भेट घेत आपली बाजू मांडली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वत: स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आज भेट देत आहेत. यावेळी बारसू पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे आणि राणे गटातर्फे यावेळी राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी रत्नागिरी शहरात मनसेची जाहीर सभा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रकल्पाच्या बाजूने बोलणार की विरोधी सुरु लावणार याकडेही लक्ष लागले आहे.