ऑनलाईन व्यवहार करताय सावधान! तुमचीही होवू शकते फसवणूक
भाजीपासून रिक्षापर्यंत अनेक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने करण्याकडे कल आहे. तरुणच नाही तर वयोवृद्धही सध्या डिजीटल पेमेंटकडे हळूहळू वळताना दिसत आहेत. तुम्हीही डिजीटल पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड : भाजीपासून रिक्षापर्यंत अनेक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने करण्याकडे कल आहे. तरुणच नाही तर वयोवृद्धही सध्या डिजीटल पेमेंटकडे हळूहळू वळताना दिसत आहेत. तुम्हीही डिजीटल पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
डिजीटल पेमेंट करताना नेहमी सतर्क राहाणं गरजेचं आहे. त्यातून कोणतीही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. डिजीटल पेमेंट केल्याचा बहाणा करत फसवणूक करणाऱ्या टोळीचा रायगड पोलीसांनी पर्दाफाश केला.
या गुन्हयात 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अलिबागमधील एका सोन्याच्या पेढीतून काही तरूणांनी सोने खरेदी केलं. त्याचे डिजीटल पेमेंट केल्याचा एसएसएसही त्या व्यापारयाला मिळाला परंतु हा एसएमएस बनावट होता.
हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलीसांत तक्रार केली. रायगड पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे याचा समांतर तपास सुरू असताना काही धागेदोरे हाती लागले.
सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीसांनी तीन जणांची मुंबईतून गठडी वळली. भावेश पडीयार , अपूर्व गोहील, मोहीत राजपूत अशी त्यांची नावे असून त्यांनी यापूर्वीदेखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपींकडून महागडी दारू, सोनयाचे दागिने, स्कोडा कार असा 13 लाखांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. हे तरूण सुशिक्षित असून त्यांनी रायगड जिल्हयासह मुंबई, नगर, गुजरात येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं. दरम्यान डिजीटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगा असं आवाहन पोलीसांनी केलं.