सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर राज्यात उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. मात्र पुण्यात या उत्सहाला गालबोट लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहीहंडीच्या उत्सवात नाचत असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. 


दरम्यान, यातील एका सराईताने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना शुक्रवारी रात्री वडगाव भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.


ओंकार लोहकरे असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तुकाईनगर परिसरात असणाऱ्या कॅनॉल शेजारील रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. 


मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मधील महादेव नगर येथील वेताळ मित्र मंडळ दहीहंडी उत्सवात शुभम जयराज मोरे (रा.महादेव नगर वडगाव) हा त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. यावेळी आरोपी चेतन ढेबे, ओंकार लोहकरे, अनुराग चांदणे, ज्ञानेश्वर जाधव, बाला धेबे, साहिल उघडे, वैभव साबळे व त्यांच्या सात ते आठ मित्रांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोरे याला मारहाण केली. 


यावेळी आरोपी लोहकरे याने त्याच्या जवळील पिस्टलने हवेत गोळीबार केला. तर,चेतन ढेबे याने मोरे याच्या मानेवर  वार करून जखमी केले. आरोपींनी मारहाण करत या भागात दहशत निर्माण केली. 


याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी यातील आरोपी बाला ढेबे याला तत्काळ ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.