धक्कादायक! आंतरजातीय प्रेमविवाह केला हिच तिची चूक ठरली, अशी क्रूर शिक्षा मिळाली
पुरोगामी महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार, पोलिसांची गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मुलीने दुसऱ्या समाजाच्या मुलासोबत आंतरजातीय प्रेम विवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या आई वडिलांनी मुलीला मुलाच्या घरून मारहाण करून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावातली ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी धक्कादायक आणि तितकीच संतापजनक आहे.
या प्रकरणी मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या कुटुंबा विरोधात मोर्शी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप मुलाने केला आहे.
नेमकी घटना काय?
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील बाळा या गावातील एका बावीस वर्षाच्या तरुणाचे सावरखेड इथल्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. पण घरच्यांचा विरोध झुगारुन 28 तारखेला मुलगा आणि मुलीने अमरावतीमधल्या आर्य समाजात प्रेमविवाह केला.
पण मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. लग्नामुळे मुलीचं कुटुंब प्रचंड संतापलं होतं. याच संतापाच्या भरात चार मेला मुलीचे आई-वडिल आणि नातेवाईक मुलाच्या घरी पोहचले. मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या पालकांनी मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. यावरच ते थांबले नाहीत मुलगी विरोध करत असतानाही तिला अक्षरश: फरफटत घरी घेऊन आले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी मुलीच्या नातेवाईकांविरोधात पोलीस तक्रार केली. पण अजूनही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.