Crime News : पोलिस कॉन्स्टेबलने अल्पवयीन मुलीसोबत केलं लग्न; गरोदर अवस्थेतील कृत्याने बीड हादरलं!
Crime News : बीड जिल्ह्यात वारंवार बालविवाहाची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यामुळे सरकारी कर्चमाऱ्याकडूनच बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Crime News : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात (Maharshtra News) आजही बालविवाहाची (child marriage) कुप्रथा आजही कायम आहे. वयात आलेल्या मुलीचं लवकर लग्न (Marriage) लावून दिलं तर आपल्या जबाबदारीतून आपण मोकळं होऊ, समाजातल्या वाईट नजरांपासून तिचं संरक्षण होईल असा समज ठेवून आई - बाप मुलींची कमी वयातच लग्न लावून देतात. बालविवाह रोखण्यासाठी सकाळी पातळीवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र ते अपूरे पडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यानेच हा कायदा धुडकावत धक्कादायक कृत्य केले आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई नाही
बीडमध्ये (Beed crime news) एका पोलीस कर्मचाऱ्यानेच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बालविवाहासोबत या पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या किळसवाण्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अल्पवयीन पत्नी गरोदर (pregnant) राहिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करत गोळ्या खायला घातला तिचा गर्भपात केला, असा आरोपही पीडितेने केला. दुसरीकडे या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने पोलीस खातेच या कर्मचाऱ्याला वाचवत आहे का असा संशय निर्माण झाला आहे.
माहेरच्यांकडे पैशांची मागणी
पीडितेच्या तक्रारीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 18 मे 2022 रोजी बीड पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यासोबत लग्न लावून देण्यात आले होते. महिनाभर सर्व काही सुरळीत चालल्यानंतर सासरच्यांनी मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीकडे पती, सासरा, सासू, जाऊ, दीर, नणंद यांनी प्लॉट घेण्यासाठी तुझ्या माहेरुन 15 लाख रुपये घेवून ये असे सांगितले. यानंतर 15 लाख रुपये द्या नाहीतर मुलीला पाठवू नका असेही माहेरच्यांना सांगण्यात आले. यानंतर पीडित मुलीच्या पतीने थेट माहेरी जात तिला मारहाण केली आणि 15 लाख द्या अशी धमकीही दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर पीडितेने तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांत तक्रार देताना मुलीने आपले वय 17 वर्षे असल्याचे सांगितले होते. या महत्त्वाच्या गोष्टीकडे कोणाचेच लक्ष गेले असे शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच तेव्हाच पोलिसांनी पोलीस कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात बालविवाहाविरोधात गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील दखल घेतली आहे. हा सर्व प्रकार पाहून जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. संबधित पोलीस कर्मचाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.